कणा - कवी कुसुमाग्रज (kana poem by Kusumagraj)

कणा - कुसुमाग्रज(kana poem by Kusumagraj)

कणा
 

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!
                      भयंकर संकटातही आपला कणा म्हणजेच स्वाभिमान ताठ  कसा ठेवता येईल ; याची शिकवण देणारी ही कविता आहे.  कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या दिव्य  लेखणीतून तयार   झालेले    हे काव्यशिल्प अजरामर आहे. ज्या ज्या वेळी कुठेतरी निराशेची छाया जीवनाला ग्रासण्याचा प्रयत्न करते; त्या त्या वेळी ही कविता आपल्याला ताठपणे उभे राहून जीवनाचे गाणे हे आनंदाने गायचे असते; दुःखाने कुढत बसायचे नसते हेच सांगत आहे.
                        ही कविता मला बीएला होती. आमच्या मराठीच्या शेख सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने या कवितेचे रसग्रहण सादर केले होते. कुसुमाग्रजांच्या इतरही आणि कविता होत्या त्या सर्वच अतिशय सुंदर आहेत. जीवनाला दृष्टी देणारे आहेत. मनाला पुष्ट करणारे आहेत.
                        परंतु दरवर्षी जेव्हा जेव्हा 27 फेब्रुवारी ही तारीख येते आणि "मराठी भाषा गौरव दिन "साजरा होणार असतो ;  तेव्हा ही कविता माझ्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही आणि या कवितेचे रसग्रहण करणारे आमचे सर सुद्धा आठवल्याशिवाय राहत नाहीत. सरांनी कुसुमाग्रजांच्या या कविता अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला शिकवल्या. त्यामधील काव्यरस आम्हाला चाखायला शिकवला. त्यांचे आम्हा विद्यार्थ्यांवर खूप ऋण आहेत. त्यांच्यामुळे आम्हांला कुसुमाग्रज समजू लागले; उमजू लागले आणि जीवनाची दृष्टी या "कणा " सारख्या कवितेतून कशी भेटते हे आम्हाला समजले.              
                                                                         धन्यवाद !!!
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा

वारी